Ad will apear here
Next
‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ!

नाटकाचा ध्यास, आसक्ती, सिनेमा-नाटकांत आलटून पालटून असलेल्या भूमिका, नाट्य अथवा चित्रसृष्टीतला बेफाम, बेधडक स्वरूपाचा वावर, स्वभावातला बिनधास्तपणा, उधळेपणा, त्या-त्या भूमिकेत शिरून जगणं, त्या सगळ्या कैफात असताना स्वत्व आणि भोवतालच्या जगाचा विसर पडणं आणि शेवटी शेवटी स्थल-कालाचं भान हरपून अचानक संपणं... या सगळ्या घटनाक्रमांमधून रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं अवघं आयुष्य आपल्या डोळ्यांसमोर उभा करणारा, ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या डॉ. घाणेकरांच्या या चरित्रपटाबद्दल...
................
डॉ. काशिनाथ घाणेकर‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा या वर्षीच्या दिवाळीतला एक महत्त्वाकांक्षी बायोपिक! डॉक्टरांचा काळ हा आताच्या पिढीच्या (तिशी-चाळिशीतल्या) लोकांना माहीत असायचं फारसं कारण नाही. त्याआधीच्या पिढीतल्या लोकांचा लहानपणाचा/ तरुणपणचा हा काळ. त्या काळातल्या व्यक्तीवर चरित्रपट बनवणं, हेच मुळात एक आव्हान आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी हे आव्हान उत्तमरीत्या पेललंय. महेश एलकुंचवारांचं ‘त्रिबंध’ आणि सुभाष अवचटांचं ‘स्टुडियो’ या पुस्तकांमध्ये, ‘फँटसी राइड थ्रू नोस्टाल्जिया’ प्रकारची काही प्रकरणं आहेत. या प्रकरणांमध्ये, लेखकाला त्याची आवडती भूतकाळातली व्यक्तिमत्त्वं सदेह रुपात भेटतात. इतकंच नव्हे, तर ती संवाद साधतात. कधी हे मोलाचे क्षण, अपार दुःखाचे असतात, तर कधी अमाप सुखाचे! असाच काहीसा अनुभव ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा पाहताना येतो. 

डॉ. घाणेकर, सुलोचनादीदी, भालजी पेंढारकर, वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू अशी अनेक व्यक्तिमत्त्वं, सदेह रूपांत चित्रपटभर वावरतात, संवाद साधतात आणि जुना काळ संदर्भासह आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. साजरा करतात. जुना काळ हुबेहूब उभा करण्याकरता नेपथ्यकाराचं कौशल्य पणाला लागतं. काही किरकोळ गोष्टी व काही सेट्स वगळता, हा काळ सिनेमात उत्तमरीत्या उभा केला गेला आहे. पात्रांची केशभूषा, वेशभूषा, देहबोली इत्यादी लकबींवर पुष्कळच मेहनत घेतलेली जाणवते. डॉ. काशिनाथ घाणेकर हे अवघं ५६ वर्षांचं, पण अतिशय वादळी असं आयुष्य जगले. डेंटल सर्जन असूनही त्यांचा मूळचा पिंड अभिनेत्याचा. १९६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांतून कामं केली. वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. घाणेकरांचं व्यक्तिमत्त्व, त्यातले बारकावे, त्यांचं वैवाहिक जीवन, त्यातले चढ-उतार, नाटक आणि सिनेमातला त्यांचा करिअर ग्राफ, महत्त्वपूर्ण भूमिका, प्रेक्षकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता आणि नंतरच्या काळात जनतेचा ओढवून घेतलेला रोष, इत्यादी गोष्टी तपशीलांसह दाखवणारा, हा एक अतिशय मोठा स्पॅन असणारा सिनेमा आहे. 

सुबोध भावेदिग्दर्शन, संवाद, संकलन, अभिनय, नेपथ्य, संगीत, छायांकन, अशा सर्वच आघाड्यांवर हा सिनेमा उत्तम ठरतो. मराठी सिनेमाबाबत बोलताना, लिहिताना, विचार करताना, ‘सुपरस्टार’ हा शब्द मी आजवर वापरलेला नाही. आज वापरतो. सुपरस्टार एकच! घाणेकरांच्या भाषेत, लांडगा एकच! सुबोध भावे! काय भूमिका केली आहे या माणसानं..! हे असतं भूमिका समरसून जगणं. हे असतं स्टारडम! डॉ. घाणेकर म्हणजे साक्षात अॅटिट्यूड. घाणेकर म्हणजे स्टाइल; घाणेकर म्हणजे आग, तडफ, ईर्ष्या, आत्मविश्वास. हे सगळं, सुबोध जगलाय. अफाट ताकदीनं तो हे सगळं उभं करतो. दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि गुरू ठाकूर यांनी लिहिलेले संवाद तितकेच तोलामोलाचे. या संवादांना सुबोधचा अभिनय चार चाँद लावतो. वेगळ्याच उंचीवर नेतो. देहबोली, संवादफेक, आवाजाचा सुयोग्य वापर, त्यातली जरब, मुद्राभिनय, हालचाली, सगळंच बघत राहावं असं. 

नंदिता धुरी, डॉ. इरावती घाणेकर यांच्या भूमिकेतडॉ. घाणेकर म्हणजे सुबोध भावे आणि सुबोध म्हणजेच डॉ. घाणेकर, हे समीकरण अनंत काळाकरिता डोक्यात फिट बसणार आहे, हे नक्कीच. सुबोधच्या कारकीर्दीत, आजवर साकारलेल्या भूमिकांमध्ये, डॉ. घाणेकर ही भूमिका सर्वोच्च स्थानी येईल असं म्हणायला हरकत नाही. ही भूमिका अशा प्रकारे इतर कुणीही करू शकणार नाही, यात कसलीही शंका नाही. या सिनेमातले सर्वांचेच अभिनय जबरदस्त झाले आहेत. सोनाली कुलकर्णी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी, सुमीत राघवन, प्रसाद ओक, आनंद इंगळे, प्रदीप वेलणकर, सुहास पळशीकर, मोहन जोशी अशी कलाकारांची तगडी फळी यात आहे. अनेक व्यक्तिमत्त्वं, त्यांचे स्वभाव, आपसातली नाती, आपसातला संघर्ष हे सगळं नाट्य फार प्रभावीपणे उभं केलंय. 

सुमीत राघवन, डॉ. श्रीराम लागूंच्या भूमिकेतअभिनय, दिग्दर्शन आणि संवाद हा या चित्रपटाचा मजबूत पाया आहे. प्रसाद ओकला बऱ्याच मोठ्या लांबीचा रोल मिळाला आहे. जवळपास डॉ. घाणेकरांइतकीच मोठ्या लांबीची ही प्रभाकर पणशीकरांची भूमिका आहे. सुमित राघवन या गुणी अभिनेत्याने साकारलेले डॉ. श्रीराम लागूही भावतात. कमी लांबीचे असले, तरी महत्त्वपूर्ण सीन्स सुमितच्या वाट्याला आले आहेत. त्याची एन्ट्री मध्यंतरात होते खरी; पण उत्तरार्धात तो पूर्णपणे सिनेमा व्यापून टाकतो. लागू आणि घाणेकर हा संघर्ष, हा ‘क्लास’ आणि ‘मास’मधला संघर्ष मोठ्या रंगतदारपणे पेश केला गेलाय. नंदिता धुरी आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका छोट्या लांबीच्या, पण महत्त्वपूर्ण आहेत. 

वैदेही परशुरामीवसंत कानेटकरांची भूमिका साकारणारा आनंद इंगळेही नेहमीप्रमाणे आपली एक जागा बनवून राहतो. कमीत कमी वेळात छाप टाकतो. स्त्री पात्रांमध्ये सर्वांत जास्त लक्षात राहते, ती कांचन घाणेकरांच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री वैदेही परशुरामी. सात्त्विक सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतिक. अतिशय बोलका आणि गोड चेहरा. तिचा मुद्राभिनय विशेष वाखाणण्याजोगा वाटतो. डॉ घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची, इराची भूमिका नंदिता धुरीनं समर्थपणे पेलली आहे. इराचं व्यक्तिमत्त्व अतिशय अफाट वाटलं. डॉ. घाणेकर नावाच्या वादळाला सांभाळणारं ते सोशिक व्यक्तिमत्त्व हे कुणाही सामान्य व्यक्तीच्या आकलनाबाहेरचं आहे. एक खूप वेगळ्या प्रकारची साधना जगली ही स्त्री. तिची स्वतःची अशी फिलॉसॉफी जबरदस्त असणार. 

बालगंधर्व आणि डॉ. घाणेकर या व्यक्तिमत्त्वांमध्ये कमालीचं साम्य आहे. नाटकाचा ध्यास, नाटकाची आसक्ती, सिनेमा-नाटकांत आलटून पालटून असलेला वावर, नाट्य अथवा चित्रसृष्टीतला बेफाम, बेधडक स्वरूपाचा वावर, स्वभावातला बिनधास्तपणा, उधळेपणा, त्या-त्या भूमिकेत शिरून जगणं, त्या सगळ्या कैफात असताना स्व:त्त्व आणि भोवतालच्या जगाचा विसर पडणं आणि शेवटी शेवटी स्थल-कालाचं भान हरपून अचानक संपणं.... सगळंच अगदी सारखं. शून्यातून सुरुवात, घवघवीत यश, मग अचानक सुरू झालेला आणि कधीही न संपणारा खोल गर्तेत नेणारा उतार.. सगळंच अगदी सारखं..,  चटका लावून जाणारं..! या व्यक्ती म्हणजे माणसं नव्हेतच खरं तर. त्यांचं सगळंच जबरदस्त. आनंद, कैफ, दु:ख, जल्लोष आणि पतनही! 

डॉ. घाणेकर यांच्या आयुष्याचा, थोडक्यात सिनेमाचा शेवटचा भाग पाहताना, ‘अप इन दी एयर’ सिनेमातला एयरलाइनचं प्लॅटिनम कार्ड दु:खद मनःस्थितीत हाताळणारा रायन बिंगम (जॉर्ज क्लूनी) आठवत होता. बालगंधर्व आठवत होते आणि बाजीराव पेशवेही. वेळेआधीच अचानक या जगातून एक्झिट घेणाऱ्या अथवा परिस्थितीतून विथड़्रॉ करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये किती साम्य असावं! या अशा क्लोजरमागेही एक ठराविक अशी फिलॉसॉफी असावी. त्या फिलॉसॉफीला अनुसरूनच एक ठरावीक असा साचा घडत असावा. वादळाचा अस्त घडवणारा साचा. आपलाच वेगळा चेहरा आपल्याला न-दाखवणारा. कैफात धुंद असतानाच अचानक आलेलं हे शेवटचं वळण तरी वादळाला जाणवत असेल का? का त्या वळणावरही त्याची ही आयुष्यभर चालत आलेली बेफिकिरी कायम राहत असेल? उभं आयुष्य वाजत-गाजत व्यतित केलेल्या बेफाम, बेलगाम व्यक्तिमत्त्वांचा, हा असा शेवट व्हावा? नियतीनं त्यांच्यावर केलेला हा सर्वांत मोठा अन्याय वाटतो. 

अशी चरित्रं वाचल्यावर आणि असे सिनेमे पाहिल्यानंतर, कुणाचंही आयुष्य, हा एक ‘प्री-डिझाइन्ड प्रोग्राम’ आहे, या मला पटलेल्या जुन्या निष्कर्षाप्रत मी पुन्हा एकवार येतो. शेवटाला चटका लावणारा हा नेत्रसुखद सोहळा, किमान एकदा जरूर अनुभवावा असाच आहे. नक्की पाहा. चुकवू नका. इतके चांगले चित्रपट फार कमी बनतात...

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)  

(डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्याबद्दलची एक हृद्य आठवण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZUPBU
 हर्षद, तुझं लिहिणंही झपाटून टाकतं!6
 अतिशय सुंदर लिहिलं आहे..वाचतानाच भारावून जायला होत आहे..❤️💐💐6
 खरोखर वैविध्यपूर्ण लेखन..👌👌3
 very nice review of an excellent movie3
 उत्तम लिहिले आहेस.3
 Khup sundar3
 Dear Harshad, I must congratulate you on writing an excellent review!! This is not a typical review with standard caveats or reservations. I wish this movie also get a wholehearted response from the audience now. Thanks for writing.3
 Beautiful3
 मस्त लिहिलं आहेस, जसं हवं तसं.. आवडलं 👍3
 छान लिहिलंयस ... व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडून ...1
 सिनेमाबद्दलची उत्कंठा व अपेक्षा वाढवणारे सुरेख परिक्षण ! लेखकाची निरीक्षण शक्ती , या विषयाचा व्यासंग व संवेदनशिलता प्रकर्षांने जाणवते !!2
 छान लिहीले आहे ...2
 Very well written review! You have a different style, appreciated!
Would like to argue on analogy between KG & BG!
Also, stricter editing, reducing 15 minutes, would have given a better & more lasting impact!
Agree, very few movies of this caliber are made these days!3
Similar Posts
‘द शायनिंग’ : भय आणि थराराची विशेष अनुभूती शॉट लावायची पद्धत, कॅमेऱ्याची हालचाल, संगीताचा परिणामकारक वापर, उत्तम अभिनय, दृश्यमिसळ करायच्या पद्धती, प्रभावी संवाद, संकलन, पटकथा, दिग्दर्शन, विशेष दृश्य परिणाम, रंगभूषा, इत्यादी सर्वच आघाड्यांवर ‘द-शायनिंग’ हा ८०च्या दशकातला हॉलिवूडपट जबरदस्त ठरतो. स्टॅनली क्युब्रिक या अवलिया दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अतिशय नेमका परिणाम साधतो
तारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही रत्नाकर मतकरींची खासियत आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला त्यांची ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते.
सत्या : मुंबईच्या अस्वस्थ, काळ्या इतिहासाची दृकश्राव्य डायरी अप्रतिम अभिनय, कमालीचं बांधीव आणि नेटकं दिग्दर्शन, सशक्त कथा, पटकथा, संवाद, देखणं छायाचित्रण, जबरदस्त पार्श्वसंगीत, याला तोडीस तोड असणारं संकलन आणि प्रॉडक्शन डिझाइन, अश्या सगळ्याच बाबतीत उच्च पातळी गाठणारी ‘सत्या’ ही राम गोपाल वर्मांची एक अप्रतिम कलाकृती आहे. मुंबईचा काळा इतिहास, अंडरवर्ल्ड आणि त्याच्याशी
‘जोकर’साठी फिनिक्सला ऑस्कर : कल्पित व वास्तवाच्या सीमेवरचा गूढ, रंजक अस्वस्थानुभव देणारा सिनेमा! ९२व्या ‘अकादमी अॅवॉर्डस्’चा अर्थात २०२०च्या ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा सध्या अमेरिकेत लॉस एंजलीसमध्ये सुरू आहे. ‘जोकर’मधील भूमिकेसाठी वाकीन फिनिक्सला अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं आहे. तसंच, संगीत विभागात ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’साठीही या सिनेमाला पारितोषिक मिळालं आहे. आणखीही अनेक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language